जसा मुंबईकर, पुणेकर तसाच डोंबिवलीत राहणारा ‘डोंबिवलीकर’. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक चळवळीचे केंद्र म्हणून डोंबिवलीची ओळख आहे. अनेक व्यक्ती, संस्था संघटना यांच्या कार्यातून आज डोंबिवलीचे नाव सर्वश्रुत आहे. २७ मार्च २००९ ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘डोंबिवलीकर’ नावाचा ‘ब्रॅण्ड’ उदयाला आला. कुठल्याही राजकीय व हॉट विषयाला हात न घालता मासिक चालू ठेवायचं हा निर्णय आजही ठाम आहे. डोंबिवलीच्या साहित्य विश्वातील दिग्गज आमचे शन्ना, आबासाहेब पटवारी, ज्येष्ठ पत्रकार श्री. सुधीर जोगळेकर, कै. सुरेंद्र बाजपेई सर अश्या अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डोंबिवलीकर मासिकाची सुरुवात झाली. नंतर या परिवाराच्या माध्यमातून या परिवाराचे वेगळेपण असं की ‘डोंबिवलीकर’ हे एक सर्वसमावेशक असं कुटुंब आहे.
डोंबिवलीकर मासिक, डोंबिवली नगरीचं प्रतिबिंब ठरलेली डोंबिवलीकर दिनदर्शिका, दिवाळी अंक, याचबरोबर विविध कलागुणांना वाव देणारे ‘डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवार’ असे खुले व्यासपीठ उभारले आहे. विशेष म्हणजे डोंबिवलीकर ही संपूर्णपणे अराजकीय पण सांस्कृतिक चळवळ आहे. राजकारणातील ”र” इथे उच्चारला जात नाही की लिहीला जात नाही.
आम्ही दरवर्षी गुढीपाडव्याला म्हणजेच ‘डोंबिवलीकर’च्या वर्धापनदिनाला डोंबिवली नगरीतील विविध क्षेत्रांतील 50 मान्यवरांना त्यांनी मिळवलेल्या यशासाठी, केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी ‘आदर्श डोंबिवलीकर’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करत असतो.